छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक तर आहेतच पण, ते धर्मवीर नाहीत, असे म्हणणे हा महाराजांच्या विचारांशी द्रोह: देवेंद्र फडणवीस
जनतेसाठी जाणते राजे एकच, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज : देवेंद्र फडणवीस
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक तर आहेतच. तसे म्हणण्यास कुणाचा नकार असण्याचे कारण नाही. पण, ते धर्मवीर नाहीत, असे म्हणणे हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह आहे. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी लढा दिला.
पुणे, दि. 5 जानेवारी – आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे आहेत. कुणाला आपल्या पक्षनेत्याला काही म्हणायचे असेल तर त्यांनी ते जरुर म्हणावे. पण जनतेसाठी, फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे एकच जाणते राजे आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानासंदर्भात माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, ते बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबतही माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक तर आहेतच. तसे म्हणण्यास कुणाचा नकार असण्याचे कारण नाही. पण, ते धर्मवीर नाहीत, असे म्हणणे हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह आहे. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे नसते तर महाराष्ट्रात आज हिंदू शिल्लकच राहिले नसते.
मुंबईसाठी विशेष पोलिस आयुक्तांची नेमणूक केल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, पूर्वी मुंबईच्या पोलिस आयुक्ताचे पद हे अतिरिक्त महासंचालक दर्जाचे होते. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ते पोलिस महासंचालक दर्जाचे केले. मुंबईची एकूण व्याप्ती पाहता असे केले होते. पुढील काळात अतिरिक्त महासंचालक दर्जाचे पद निर्माण करण्याची प्रक्रिया राहून गेली. ते आता केल्याने मिसिंग लिंक पूर्ण झाली आहे. यात कुठेही दुसरा उद्देश नाही. ते पोलिस आयुक्तांतर्गतच काम करणार आहेत.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्योग आकृष्ट करायचे असतील किंवा गुंतवणूक परिषद आयोजित करायची असेल तर प्रत्येकाला मुंबईतच यावे लागते, ही आपली शक्ती आहे. खरे तर याचा आपल्याला अभिमान असायला हवा. शेवटी कुणी कुणाचेही उद्योग पळवू शकत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
आपण अभिमान बाळगला पाहिजे की, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि प्रत्येकाला मुंबईतच यावे लागेल. भाजपाच्या मिशन-45 संदर्भात ते म्हणाले की, मिशन-43 आम्ही दोन वेळा करून दाखविले. त्यामुळे मिशन-45 काय अवघड आहे? आम्ही तर मिशन-48 पण ठेऊ शकतो. पण, आपण लोकशाहीत काम करतो.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैयक्तिक चिखलफेक होऊ नये, या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे मी स्वागत करतो. फक्त त्यांचे हे विचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकून घ्यावे. कारण, तीच मंडळी सोशल मीडियात घाणेरडी टीका करतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंचे विचार एकदा ऐकावे, अशी आमची अपेक्षा आहे, असेही फडणवीस म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe