छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

पायपीट करीत, कधी रिक्षा, लालपरीने प्रवास करणारा युवक आज विमानाने उद्घाटन सोहळयास आला ! संघर्षही एन्जॉय करतो तो खरा कलावंत : अभिनेते योगेश शिरसाठ

युवा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन, अभिनेते योगेश शिरसाठ, अनुष्का सरकटे यांची उपस्थिती

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ : ’संघर्ष’ हाच पाचवीला पुजलेला होता असा कुटुंबातून पुढे आलेला माझ्यासारखा तरुण युवक महोत्सवाचे उद्घाटक बनतो, हेच महोत्सवाचे यश आहे. तब्बल बारा वर्षे करावा लागलेला संघर्षही मी ’एन्जॉय’ केला, असे प्रतिपादन अभिनेते योगेश शिरसाठ यांनी केले. पायपीट करीत, कधी रिक्षा, महामंडळाची लाल गाडी, ट्रेनने प्रवास करणारा युवक आज विमानाने उद्घाटन सोहळयास आला याचा मनस्वी आनंद वाटतो. आयुष्यात प्रत्येक क्षण ’एन्जॉय’ करा, असे आवाहनही योगेश शिरसाठ यांनी केले. केंद्रीय युवा महोत्सवात शिरसाठ बोलत होते.

पुढील तीन दिवस युवा कलावंताच्या हजेरीने बहरणा-या केंद्रीय युवा महोत्सवात बुधवारी जल्लोषात सुरुवात झाली. मराठवाडयाचे भूमिपूत्र अभिनेते योगेश शिरसाठ, अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या हजेरीने सोहळा चांगलाच रंगला. नाट्यशास्त्र विभागाच्या शेजारील सृजन रंगमंचावर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा झाला.

मंचावर प्रकुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ.योगिता होके पाटील, डॉ.अंकुश कदम, संचालक डॉ.मुस्तजिब खान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सल्लागार समितीचे सदस्य प्रा.संभाजी भोसले, डॉ.दासू वैद्य, डॉ.जयंत शेवतेकर, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.संजय पाटील देवळाणकर यांची विशेष उपस्थिती होती.

प्रारंभी योगेश शिरसाठ यांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन सोहळयाचे उद्घाटन झाले. महोत्सवात २५० महाविद्यालयांचे सुमारे तीन हजार कलावंत सहभागी झाल्याचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी सांगितले. प्रारंभी डॉ.गणेश शिंदे यांनी बनविलेली ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, रवींद्र काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

आवाजामुळे मिळाली अभिनयाची संधी : अनुष्का सरकटे
महाविद्यालयीन जीवनात गाण्याची आवड होती. कधी अभिनेत्री होऊ असा विचारही केला नव्हता. कधी आवाजाच्या या देणगीमुळेच मालिका, चित्रपटात कामे मिळत गेली, असे उद्ग्गार अभिनेत्री अनुष्का सरकटे यांनी काढले. जिथे शिकले तिथेच पाहुणी म्हणून आले याचा मनस्वी आनंद वाटतो, असेही त्या म्हणाल्या.

मराठवाडा कलावंताची भूमी : कुलगुरु
मराठवाडा ही संताची तसेच कलावंताची भूमी आहे. नाटयशास्त्र विभागाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्षे असून अनेक मोठी कलावंत या भूमीत घडले. हा महोत्सव आपणास खुप काही शिकवून जाईल. प्रत्येक माणूस हा कलावंत तर जग हीच रंगभूमी आहे, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गॅदरींग, युवक महोत्सव हा सुप्त कलागुणांना वाव मिळवून देणारा असतो. महोत्सवातील अनेक आठवणी, प्रसंग आपल्या काळजावर कोरले जातात. महोत्सवात मिळालेली कौतुकाची थाप आयुष्यभराची ऊर्जा देऊन जाते. अशाच आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण सहा कला गटातून महोत्सवात होणार आहे.

३६ कला प्रकारातील या स्पर्धांचे सादरीकरण पुढील चार दिवसात आपण करणार आहोत. जवळपास तीन हजार कलावंताची हजेरी महोत्सवात लाभणार आहे. एखाद्या कलाप्रकारात जिंकण्यापेक्षाही सहभागी होणे जास्त महत्वाचे असते. माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे आज जग ‘वैश्विक खेडे‘ बनले आहे. अशा काळात सारेच जग जवळ येऊन ठेपले आहे. सोशल मीडियातून आपल्या कलांचे सादरीकरण आजची पिढी मुक्तपणे करु लागली आहे. युवा कलावंतांचे ‘फेसबुक, युटयूब, व्हॉटसअ‍ॅप‘ वर असे लाखो व्हिडीओ ‘व्हायरल‘ होत आहेत.

आपले सर्व जग आता ‘टेक्नोसॅव्ही‘ बनले असून जिवनाला गतिमानता आली आहे. काळाबरोबर ‘तंत्र‘ बदलले तरी जगण्याचा शाश्वत सत्याचा ‘मंत्र‘ बदलून चालणार नाही. तेव्हा या युवक महोत्सवापासून आपण एक निर्धार करा. आयुष्यात जे ही करील ते उत्तम व दर्जेदार करण्याचा प्रयत्न करीन. कुणाची नक्कल करत बसणार नाही तर स्वत:च्या कर्तबगारीवर आकाशाला गवसणी घालीन. ते करण्यासाठी आपल्या पंखाना गरुड पंखांच वरदान मिळेल, असा विश्वास मला वाटतो.

Back to top button
error: Content is protected !!