Uncategorizedमहाराष्ट्र
Trending

राज्याच्या अनेक भागांत वीज गायब, महावितरण खासगीकरणाच्या विरोधात ७२ तासांचा संप सुरु ! आंदोलकांनी राज्य सरकारला धारेवर धरले !!

मुंबई, दि. ४ – खासगीकरणाच्या विरोधात वीज कामगार संघटनांनी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात केली असून हा संप ७२ तासांचा राहणार आहे. दरम्यान, रात्री १२ वाजेपासून सुरु झालेला हा संप मागण्या मान्य होईपर्यंत किंवा ७२ तास सुरु राहणार आहे. पूर्व कल्पना देऊनही राज्य सरकारने यावर तोडगा काढला नसल्याने वीज कामगार व सर्वसामान्य ग्राहक जनतेमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांत वीज गायब झाली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना कुठल्याही गैरसोयींना सामोरे जावे लागणार नसल्याचा दावा प्रशासन तथा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने या संपाची हाक दिली आहे. जनतेच्या मालकीचा वीज उद्योग वाचवण्या करीता हा 72 तासांचा संप म्हणजे 4,5,6 जानेवारी 2023 रोजी पुकारण्यात आला आहे. याशिवाय मागण्या मान्य न झाल्यास 18 जानेवारी 2023 पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.

या आहेत मागण्या

१) महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा.

२) महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देवू नका.

३) कंत्राटी, आउटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा.

४) तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा. इम्पॅनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा.

५) महावितरण मधील २०१९ नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रामधे कायम कर्मचाऱ्याची पदस्थापणा करा.

संपात सहभागी संघटनांनी ग्राहकांना केले नम्र आवाहन

१) रात्री १२:०० वाजलेपासून म्हणजे ०४.०१.२०२३ च्या ००:०० पासून आम्ही निर्मिती, पारेषण आणि वितरण चे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कामगारवर्ग ७२ तासांच्या संपावर जात आहोत.

२) मुंबई आणि पुणे शहर येथे अदानी इलेक्ट्रिक कंपनी ने समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला असून इतरही नफ्याची शहरे ताब्यात घ्यायचा सदर कंपन्यांचा प्रयत्न आहे.

३) सद्यस्थितीत Cross Subsidy च्या समीकरणातून संपूर्ण महाराष्ट्रात एकच वीजदर लागू केला जातो, ज्यामुळे विजेचे दर नियंत्रणात राहतात.

४) असे खाजगीकरण झाल्यास Cross Subsidy च्या समीकरणावर थेट परिणाम होऊन वीजदर नियंत्रणाबाहेर जातील

५) या गोष्टीला विरोध म्हणूनच आम्ही प्रशासनाला दीड महिन्यापूर्वीच संपाची नोटीस दिली होती. * पण प्रशासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

६) या संपाचा परिणाम सर्वांवरच होऊ घालणार आहे, वीजपुरवठा आहे असा ठेऊन आम्ही संप सुरू करीत आहोत, पण वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कधी पूर्ववत होईल हे सांगता येणार नाही.

७) आपणास (ग्राहकांना) सर्व गोष्टींची कल्पना असावी, आणि चुकीच्या बातम्या येऊन गैरसमज होऊ नयेत म्हणून ह्या आवाहनाचा प्रपंच.

८) मोबाईल आणि तत्सम गोष्टी चार्ज करून ठेवावेत, सर्व शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी करावी. होणाऱ्या तसदीसाठी दिलगीर आहोत, पण आज नाही तर कधीच नाही.

९) आपल्या सर्वांच्या हक्कासाठी पुढील चांगल्या भवितव्यासाठी संपास पाठिंबा देणे बाबत व सहभागी होण्याबाबत आवाहन करत असल्याचे आंदोलक वीज कर्मचार्यांनी म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!