अंबडमध्ये व्याजाच्या पैशाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत आत्महत्या, जामखेडमधील सावकाराने तगादा लावल्याने तरुण शेतकऱ्याने मरणाला कवटाळले !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – घर व शेतीच्या खर्चासाठी व्याजाने घेतलेल्या पैशाचा तगादा वाढल्याने कंटाळून शेतकऱ्याने विहीरीत आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पागीरवाडीत समोर आली आहे. आधीच अवकाळीचा कहर त्यात सावकारीचा पाश यात शेतकरी मरणाला कवटाळीत आहे. दरम्यान, जामखेडच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत काळे (वय 30 वर्षे, रा. पागीरवाडी ता. अंबड जि.जालना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात मृत शेतकऱ्याच्या पत्नीने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, मागील आठवड्यात शनिवारी सकाळी सात वाजेचे सुमारास त्या झोपेतून उठून घरकाम करीत असताना त्यांचे पती भारत काळे हे घरी झोपलेले होते. तेव्हा जामखेड येथील शिवाजी भोजने, कुंडलिक शिवाजी भोजने हे त्यांच्या घरी आले. त्यांनी भारत काळे कोठे आहे म्हणून पत्नीला विचारणा केल्यावर ते घरात झोपलेले आहे काय काम आहे असे विचारत असतांना ते दोघेही घरात घुसले.
भारत काळे यांना उठवून त्यांना पैसे मागू लागले तेव्हा काळेंच्या पत्नीने त्यांना कशाचे पैसे म्हणून विचारले. त्यावर त्यांनी तू बोलु नको, तुझ्या नव-याने आमच्याकडून व्याजाने 35000/- हजार रुपये घेतले आहे तो देत नाही. जो पर्यत आमचे पैसे देत नाही, तो पर्यंत त्याला सोडणार नाही असे म्हणून भारत काळे यास ओढत मारहाण करत घराबाहेर काढले. भारत काळे यांना सोडवण्यास गेलेल्या त्यांच्या पत्नीलाही त्यांनी मारहाण करून ढकलून दिले.
त्यानंतर त्या दोघांनी भारत काळे यांना त्यांच्यासोबत मोटार सायकलवर बसवून घेवून गेले. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता भारत काळे हे घरी परत आले. त्यावेळी ते खुप घाबरलेले होते. शिवाजी भोजने, कुंडलिक शिवाजी भोजने (रा. जामखेड) यांनी तुम्हाला कशाला सोबत नेले होते असे भारत काळे यांना त्यांच्या पत्नीने विचारले असता त्यावर भारत काळे यांनी सांगितले होते की, घर व शेती खर्चासाठी मी त्यांचेकडून व्याजाने 35000/- रुपये रखमाजी कुंडकर कडून 28000 रुपये, केके बाबा भोजने 10000 रुपये यांचेकडून घेतलेले आहे. ते मला जामखेडमध्ये गेल्यावर वारवार पैसाची मागणी करून त्रास देतात. त्यांना पैसे परत करणे आहे. त्यांनी मला मारहाण करुन पैसे नाही दिले तर मला जिवे मारु म्हणून धमकाविले आहे असे भारत काळे यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले होते.
दरम्यान, दिनांक 09/03/2023 रोजी सकाळी दहा वाजता सुमारास भारत काळे यांची पत्नी गावातील शेतात काम करण्यास गेली होती. त्यावेळी भारत काळे हे घरीच होते. दरम्यान, मोबाईलवर शिवाजी भोजने (रा. जामखेड) याने धमकावले. भारत काळे यांनी पैसे परत नाही दिले तर त्याला शेतात नेवून त्याच्या अंगावर गुळाचा पाक टाकून त्याला मारु असा धमकीचा फोन केला होता.
दरम्यान, भारत काळे यांचा शोध घेत असताना माहीती मिळाली की, दत्तात्रय अचीत पागीरे यांचे शेतातील विहरीत भारत काळे हे पाण्यावर तरंगत आहे. त्याठिकाणी अंबड येथील पोलीस आल्यावर भारत काळे यांना विहीरीतून बाहेर काढले मात्र, तत्पूर्वीच त्यांनी जीव सोडला होता. त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने पोलीसांनी त्यांना सरकारी दवाखाना अंबड येथे दाखल केले. तेथे पोस्टमार्टम करण्यात आला.
याप्रकरणी मृत शेतकरी भारत काळे यांच्या पत्नीने अंबड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून 1) शिवाजी भोजने 2) कुंडलिक शिवाजी भोजने 3) रखमाजी कुंडकर 4) केके बाबा भोजने (सर्व रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe