गंगापूर

एकीकडे वादग्रस्त वक्‍तव्यांची स्पर्धा अन्‌ दुसरीकडे शेतकरी जिवावर उदार!; गंगापुरातील या शेतकऱ्याने सकाळीच शेत गाठून उचलले टोकाचे पाऊल!!

गंगापूर, दि. ११ ः राज्‍यात वादग्रस्त वक्‍तव्यांची स्पर्धा लागली असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला राज्‍यकर्त्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, वाढता कर्जाचा डोंगर यामुळे गंगापूर तालुक्‍यातील वाहेगावातील ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना ९ डिसेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

सुखदेव सारंगधर हिवाळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्‍यांच्यावर एक लाख रुपये व त्‍यांच्या आईच्या नावे एक लाख रुपयांचे कर्ज होते. खासगी सावकाराकडूनही त्‍यांनी काही रक्कम व्याजाने घेतली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे त्‍यांच्या शेतातील पीक वाहून गेले होते. त्यामुळे कर्जाचा डोंगर फेडण्याची चिंता त्‍यांना होती. यातून ते नैराश्यात गेले. सरकारकडून मदतीचा कोणताही आशेचा किरण दिसत नसल्याने त्‍यांनी शेतात गळफास घेतला. गंगापूर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह फासावरून उतरवला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. सुखदेव यांच्या पश्चात आई, पत्‍नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!