छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

वसंतराव काळे विधी महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर नियुक्तीचा घोटाळा ? विद्यापीठानेही दिली खोट्या कागदपत्रांना मान्यता, गुन्हा दाखल !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – महावि‌द्यालयाला मुलाखतीच्या वेळी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फिर्यादीच्या नावे खोटे नियुक्तीपत्र तयार केले. त्यांचे जॉईनिंग दाखवून त्यावर त्यांची खोटी सही करून तसेच मुलाखतीसाठीच्या उपस्थिती पत्रावर खोटी सही करून मान्यतेसाठी सदरचे कागदपत्र वि‌द्यापीठात सादर करून विद्यापीठाची असिस्टंट प्रोफेसरसाठी मान्यता घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यासंदर्भात बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौकशीची सूत्रे हलवली आहे.

बाळासाहेब पवार (वय ५३, रा. शिवा ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर), तृप्ती वाघमारे (रा. उडलॅंन्ड पार्क, एन ३, सिडको, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात डॉ. राजकुमार विठ्ठलराव पानगांवकर (व्यवसाय वकीली व तासिका तत्व, रा. नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सन-2023 मधील जुलै महिन्यात फिर्यादीला माहिती मिळाली की, शिवा ट्रस्टच्या अंतर्गत असलेले कै. एमएलए वसंतराव काळे विधी महावि‌द्यालय शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्य पदाची जागा रिक्त असल्याने फिर्यादीने दि 08/07/2023 रोजी प्राचार्य पदासाठी अर्ज केला होता.

त्यावर फिर्यादीला सदर संस्थे कडून पोस्टाने पत्र प्राप्त झाले. त्यानुसार दि. 17/07/2023 रोजी 11.00 वाजता तोंडी मुलाखतीसाठी शिवा ट्रस्ट एज्यूकेशन निपाणी भालगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक कागदपत्रासह हजर राहण्याबाबत कळवले होते. त्यानुसार फिर्यादी शैक्षणिक कागदपत्रासह त्याच दिवशी मुलाखतीसाठी हजर राहिले. तेथे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार व इतर तीन सदस्यांनी फिर्यादीची मुलाखात प्राचार्य पदासाठी घेतली. त्यावेळी फिर्यादीने प्रभारी प्राचार्या तृप्ती वाघमारे यांच्याकडे शैक्षणिक कागदपत्रांच्या मुळ प्रती दाखविल्या व छायांकित प्रती सादर केल्या होत्या. त्यानंतर आज पावेतो सदर संस्थेकडून फिर्यादीला प्राचार्य पदासाठी कोणतेही नेमणुक पत्र प्राप्त झालेले नाही. त्यानंतर दि. 19/07/2023 रोजी फिर्यादी डॉ. आंबेडकर विधी महावि‌द्यालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर येथे तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून रुजू झाले ते आजपर्यंत तेथे कार्यरत आहे.

दरम्यान, फिर्यादीला नंतर धक्कादायक माहिती मिळाली. दि. 17/07/2023 रोजी वरील महावि‌द्यालयाला मुलाखतीच्या वेळी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फिर्यादीच्या नावे खोटे नियुक्तीपत्र तयार केले. त्यांचे जॉईनिंग दाखवून त्यावर त्यांची खोटी सही करून तसेच मुलाखतीसाठीच्या उपस्थिती पत्रावर त्यांची खोटी सही करून मान्यतेसाठी सदरचे कागदपत्र वि‌द्यापीठात सादर करून विद्यापीठाची असिस्टंट प्रोफेसरसाठी मान्यता घेतलेली आहे. तसेच फिर्यादीच्या नियुक्तीमध्ये त्यांच्या जात/प्रवर्गाची माहितीही खोटी सादर केलेली आहे व फिर्यादीला नियुक्ती न देता त्यांच्या नावावर पगार काढून अपहार केलेला असून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, रा. शिवा ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर, व महावि‌द्यालयाच्या प्रभारी प्राचार्य तृप्ती वाघमारे यांच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि जगताप करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!