महाराष्ट्र
Trending

ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक संपावर, पंचनामे ठप्प ! अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करून ‘अकलेचे तारे’ तोडणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचा पवारांकडून समाचार !!

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक, शेतकरी जगला तरच राज्य जगेल;राज्यातला शेतकरी हवालदिल - अजित पवार

Story Highlights
  • अवकाळी पावसासह गारपीठीने राज्यात पीकांचे अतोनात नुकसान;शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील,शासकीय यंत्रणा ठप्प

मुंबई, दि. १७ मार्च – राज्यात अवकाळी पावसासह गारपीठीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

दरम्यान राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नी काहीही‍ विधाने करुन ‘अकलेचे तारे’ तोडत असल्याचे सांगून कृषीमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यात दिनांक ५,६ व ७ मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरु झालेले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे. आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून २० मार्चपासून संपूर्ण राज्याला ‘यलो अलर्ट’ तर ११ जिल्ह्यांना ‘ऑरेज ॲलर्ट’ देण्यात आलेला आहे.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करुन ‘अकलेचे तारे’ तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत याबाबत अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने सुरु करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!