महाराष्ट्र
Trending

जालना नूतन वसाहतीत दोन गट भिडले, तलवारी, हॉकीस्टिकने हाणामारी ! तुफान दगडफेक, पोलिसही जखमी, ७० जणांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – जालना शहरातील नूतन वसाहतीत दोन गट भिडले. तलवारी, हॉकीस्टिकने ते एकमेकांवर चालून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने पोहोचले. भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिस हेड कॉन्सटेबलवरही जमावाने दगड भिरकावले. यात ते किरकोळ जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक व पोलिसांची कुमक आल्यानंतर दोन्ही गट निघून गेले. याप्रकरणी पोलिसांनी ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोहेकॉ कैलास भुजंगराव जावळे (पोलीस ठाणे कदीम जालना) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 12/11/2023 रोजी 19.50 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदाराचा फोन आला की, जांगडे पेट्रोलपंपासमोर नूतन वसाहत जालना येथे दोन गटांत भांडण चालू आहे. ही माहीती मिळताच पोहेकॉ कैलास जावळे यांनी भांडणाबाबत पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्यास फोन करून माहिती दिली व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

सदर ठिकाणी 1) चिरंजीव जांगडे, 2) आदित्य जांगडे 3) लौकीक जांगडे 4) तारेखखॉन 5) बडेखॉन 6) शेख शादाब 7) मधुसुदन 8) इकलास शेख १) इमान मनियार 10) अरशेद व इतर 50 ते 60 लोक आपसामध्ये भांडण करीत होते. त्यामध्ये आदित्य जांगडे यांच्या हातामध्ये खंजीर होता. तो मारण्यासाठी इतर लोकांच्या अंगावर धाऊन जात होता. तसेच त्यापैकी काही लोकांच्या हातामध्ये तलवार तसेच हॉकीस्टीक होत्या. ते एकमेकांच्या अंगावर जाऊन भांडण करीत होते.

त्यातील काही लोक एकमेकांवर दगडफेक करत होते. सदर दगडफेक केल्याने जमावामधील काही लोक जखमी झालेले आहे. त्यावेळी पोहेकॉ कैलास जावळे हे त्यांना भांडण करु नका एकमेकांना दगड मारु नका असे समजावून सांगत होते. समजावुन सांगत होते. त्यातील काही लोकांनी पोहेकॉ कैलास जावळे यांच्या अंगावर दगडफेक केली. त्यापैकी एक दगड पोहेकॉ कैलास जावळे यांच्या डाव्या पायावर लागून दुखापत झाली. सरकारी कामात त्यांनी अडथळा निर्माण केला.

त्यानंतर लगेच पोलीस ठाण्याचे शासकीय वाहनासह पोउपनि नागरे सदर ठिकाणी आल्याने तेथील लोक निघून गेले. तरी दि. 12/11/2023 रोजी 20.00 वाजेच्या सुमारास वरील लोकांनी हातात तलवारी, हॉकीस्टीक घेऊन आपसात झुंज करून एकमेकांना मारण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी जालना यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!