महाराष्ट्र
Trending

एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल ! येत्या १० दिवसांत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या नाहीतर छाताडावर बसून आरक्षण घेवू- मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जनसागर उसळला, सळसळत्या उत्साह

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल. येत्या १० दिवसांत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या नाहीतर छाताडावर बसून आरक्षण घेवू असा इशारा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला. २४ ऑक्टोबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर २२ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. आज सरकारला विनंती आहे की, मराठा समाजाची भावना लक्षात घ्या येत्या १० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा ४० व्या दिवशी सांगू… तसेच पुढे काय होईल याची जबाबदारी सरकारचीच राहील. एकच सांगतो लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे आहे. निवांत रहा टेन्शन घेवू नका. आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही, असा शब्दात जरांगे पाटलांनी विराट मराठा समज बांधवाच्या लाखोंच्या जनसमुदायाला दिला.

विराट इशारा महासभेला संबोधीत करताना जरांगे पाटील बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून या सभेला जोरदार टाळ्यांच्या आवाजात सुरुवात झाली. गेल्या २० वर्षांपासूनचा हा संघर्ष आता अंतिम टप्प्यावर येवून पोहोचला असल्याची आठवण यावेळी सूत्रसंचालकाने करून दिली आणि एकज गर्जना केली. एक मराठा त्याचवेळी जनसमुदायामधून बुलंद आवाज आला लाख मराठा. मनोज जरांगे पाटील यांनी आज अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या. आज भाषण होणार नाही. महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत असे मनोज जरांगे यांनी सुरुवातीलच सांगितले. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा-

१) आपली मूळ मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा.
२) कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणार्या हरामखोर नराधमाला लवकर फाशी द्यावी
३) मराठा आरक्षणासाठी बलीदान देणार्या ४५ समाज बांधवांना सांगितलेला निधी व सराकारी नौकरी तातडीने द्यावी
४) मराठा समाजाचा सर्वे करावा
५) सारथी संस्थेमार्फत पीएचडी कराणार्या विद्यार्थ्यांना ज्यास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावे
६) ५० टक्केच्या वर आरक्षण आम्ही घेणार नाही.
७) सरकारनं जे गुन्हे अजून मागे घेतले नाही ते तातडीने मागे घ्यावे

उरलेल्या १० दिवसांत आरक्षण द्या नाहीतर ४० व्या दिवशी सांगू- या प्रमुख मागण्या सरकारकडे मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे पाटील म्हणाले की, या ऐतिहासीस सभेचा घराघरातील प्रत्येकजण साक्षिदार झाला आहे. घराघरातून प्रत्येक मराठा आरक्षणासाठी पेटून उठला आहे. सरकारला आज विनंती आहे. ४० दिवसांपैकी ३० दिवस झाले जनसागराचं एकच म्हणनं आहे राहिलेल्या १० दिवसांत आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप सरकारला जो शब्द दिला त्या शब्दावर मराठा समाज आजही ठाम आहे. ४० दिवस एक शब्दही मराठा आरक्षणावर सरकारला विचारणार नाही. तुमच्या हातात आणखी १० दिवस आहे. या १० दिवसांत आरक्षण नाही दिलं तर मग ४०व्या दिवशी सांगू.

मराठ्यांची औलाद शब्द मोडीत नाही- माझा मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत घरी जाणार आहे. मराठ्यांची औलाद शब्द मोडीत नाही. सर्व पोलिसांनी बघीतलं की मराठा समाज शांततेत आले. तुम्हाला विनंती करून सांगतो भावांनो पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं आपणही त्यांना सहकार्य करायचं. आपल्या रस्त्यावरील गावकर्यांनीही सर्वांसाठी बरंच काही केलं. त्यांच्यासाठी पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली. त्यांचाही मी आभारी आहे.

सरकारने गठित केलेल्या समितीचं काम आता बंद करा- तुम्ही रात्रंन दिवस जे काबाडकष्ट करत आहात त्याचं चीज करण्याची वेळ आज आली आहे. शेवटी विनंती करून सांगतो की, मराठा समाजासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समितीचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होते की चार दिवसांत कायदा होत नाही. आता ३० दिवस झाले. ५ हजारांपेक्षाही ज्यास्त कुणबीचे पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर करा.

आग्या मोहळ शांत आहे हे काय उठलं र बुआ… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला या कोट्यवधी मराठा समाजाच्यावतीने हात जोडून सांगतो या मराठा समाजाची विनाकारण हाल अपेष्टा करू नका. या गोर गरीब समजाला केंद्रानं आणि राज्यानं तातडीने निर्णय घेवून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जाहीर निर्णय करावाच. १० दिवसांपेक्षा वाट बघण्याची आता आमची तयारी नाही. कायदा सांगतो व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या. विदर्भातल्या शेती करणार्या मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे सरकारला विनंती आहे राज्य व केंद् यांनी मिळून हा विषय गांभीर्याने घेवून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं. आग्या मोहळ शांत आहे हे काय उठलं र बुआ आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

२५० एकरवर एक मराठा लाख मराठा अन् ५० मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा या गगनभेदी घोषणा- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक भव्य दिव्य अशी सभा आज, १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी लाखो मराठा समाज बांधवांच्या उपस्थित पार पडली. तुफान गर्दी, रेकॉर्डब्रेक, जंगी, भव्य दिव्य अशा या सभेने सरकारच्या पोटात गोळा आला. सुमारे २५० एकरवर एक मराठा लाख मराठा अन् ५० मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा या गगनभेदी घोषणांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसले. नजर जाईल तिकडे फक्त अन् फक्त मराठा समोज बांधव दिसत होते. एखाद्या नेत्याच्या सभेलाही एवढी गर्दी जमली नसेल एवढी गर्दी या सभेला जमली. सर्व समाज बांधव स्वयस्फूर्तपणे या सभेसाठी आले होते.

१७ दिवस उपोषण केल्यानंतर सरकारला जाग- २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. १७ दिवस उपोषण केल्यानंतर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्यातील उपोषणस्थळी अंतरवाली सराटी येथे १४ सप्टेंबर रोजी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असून मला ३० दिवसांचा कालावधी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते तथा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ३० दिवसांचा जो अवधी मागितला होता त्यास मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करून तूर्त उपोषण मागे घेतले होते.

त्यानंतरही मनोज जरांगे पाटील स्वस्थ बसले नाही. महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला. ३० सप्टेंबरपासून त्यांनी महाराष्ट्र दौरा केला. सुमारे १३ जिल्ह्यांत २०० ठिकाणी त्यांनी मराठा समाज बांधवाशी संवाद साधला. त्यांच्या सभेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद राज्यकर्त्यांच्या उरात धडकी भरवणारा ठरला. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारासही सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला ३० दिवसांचा अल्टिमेटम आज १४ ऑक्टोबर रोजी संपला आहे. (याशिवाय १० दिवसांचा अवधी वाढवून दिला होता. म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी अल्टिमेटमची मुदत संपत आहे.)

या ऐतिहासिक सभेचा स्टेज २० बाय ३६ या आकारात होता. मनोज जरांगे पाटील यांच्या एंट्रीसाठी ६०० फुटांचा रॅंपची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे २५० एकरवर ही भव्य सभा आयोजिली आहे. लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने १० हजार स्वयंसेवक कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात समाज बांधव येणार असल्याने मैदानात १० ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली. याशिवाय ३५ कार्डियाक रुग्णवाहिका, १०० रुग्णवाहिका ,३०० डॉक्टर, ३०० नर्सिंग स्टाफ, अग्निशमक दलाच्या १० गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी २० एलईडी स्क्रिनही लावण्यात आल्या होत्या.

Back to top button
error: Content is protected !!