महाराष्ट्र
Trending

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमार, हवेतील गोळीबाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश ! दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश !!

आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गानं सुरु असलेलं आंदोलन यापुढेही त्याच मार्गानं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

Story Highlights
  • मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचं नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

संभाजीनगर लाईव्ह, दि. २- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, २ सप्टेंबर रोजी दिली.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीनं थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचं नुकसान होत आहे.

या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गानं सुरु असलेलं आंदोलन यापुढेही त्याच मार्गानं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचं नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसंच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तत्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहिल, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावं, असं आवाहन आहे.

Back to top button
error: Content is protected !!