छत्रपती संभाजीनगर

मंत्री अतुल सावे म्हणाले…तर शिंदे-फडणवीस सरकार आलेच नसते!

संभाजीनगर, दि. १५ ः राजकारणात कॉम्प्रमाईज करायचे असते ते केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या वादात आम्ही अडकलो असतो तर सरकार आलेच नसते. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही राज्याला समृद्ध करत आहेत, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री अतुल सावे यांनी संभाजीनगरात फ्रेंड ऑफ बीजेपी या कार्यक्रमात दिले.

व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक मानसिंग पवार, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर, राहुल लोणीकर, सुहास दाशरथे, बसवराज मंगरूळे, डॉ. उज्ज्वला दहिफळे उपस्थित होते. भानुदास चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, डॉक्‍टर, वकील, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी मानसिंग पवार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्याने आम्ही नाराज आहोत. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी राज्‍याचे सक्षम नेतृत्त्व केले होते अन्‌ त्यांनाच दुय्यम भूमिका घ्यायला भाग पाडले. यामुळे पक्षाचे नव्हेतर राज्याचे नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. त्यावर सारवासारव सहकारमंत्री सावे यांनी “कॉम्प्रमाईज’ची सारवासारव केली.

अपेक्षा व्यापाऱ्यांच्या…
मानसिंग पवार ः करदात्यांचा पैसा योग्य ठिकाणी जावा, रेवडी कल्चर बंद व्हावे.
आदेशालसिंग छाबडा ः आस्थापना कर महापालिकेने आकारणे बंद करावे. ६ लाख मतांची ताकद असलेला व्यापारी वर्ग आहे. त्यामुळे पक्षाने विचार करावा.
बिल्डर प्रमोद खैरनार ः करप्रणालीत सुसूत्रता आणावी.
सीए योगेश अग्रवाल ः जीएसटीतील त्रुटी दूर कराव्यात.
ॲड. नितीन चौधरी ः जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता औरंगाबादला येते. ती पूर्वीप्रमाणे ६ वाजता यावी. विमान कनेक्‍टिव्हीटी वाढवावी.

बावनकुळेंचे प्रॉमिस…
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फ्रेंड्‌स ऑफ बीजेपी कार्यक्रमातून पक्षाला काय साध्य करायचे आहे हे सांगितले. जीएसटी, रेल्वे, करप्रणाली, महापालिकेबाबत असलेल्या सूचना संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात येतील व त्यावर तातडीने निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!