महाराष्ट्र

माजलगावच्या एका वर्षाच्या मुलाला कर्नाटकात ५० हजारांत विकले ! आईने विरोध केला तरी मुलाला हिसकावून जोडप्याला दिले, नंतर गोव्याला मजा मारली अन् परतले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून माजलगावच्या महिलेला तिच्या एका वर्षाच्या मुलासह सुरुवातीला पंढरपूरला नेले. तेथे देवदर्शन घेवून सर्वजण कोल्हापूरला रवाना झाले. नंतर बेळगावमधून हुबळीकडे जात असताना एका कारमधून आलेल्या जोडप्याला त्या एका वर्षाच्या मुलाची ५० हजारांत विक्री केली. त्या मुलाच्या आईने विरोध केल्यानंतरही तिच्या ताब्यातील ते मुल हिसकावून त्या जोडप्याला दिले. त्यानंतर सर्वजण गोव्याला गेले आणि तेथून एसटीने परत बीडला परतले. बसमध्ये प्रवासात त्या महिलेची एका पोलिस महिलेशी ओळख झाली. तिने मदत मागितली अन् त्या महिला पोलिसाने तातडीने पोलिसांना हे कळवले. पोलिसही बीडच्या बसस्थानकावर पोहोचले अन् या खळबळजनक प्रकाराचा उलगडा झाला.

किशोर भोजने (जिगाव, ता. नांदुरा, जि. बुलढाणा), दीपक, एक अज्ञात पुरुष, एक अज्ञात महिला व एका माजलगावच्या महिलेवर बीडच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव (जि. बीड) येथील महिलेने पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, फिर्यादी महिला ही आई वडीलां सोबत रहाते. गावातील फिर्यादी महिलेच्या मामाने शाहुनगर येथील एका महिलेसोबत ओळख करुन दिली होती. तेव्हा पासून सदर महिलेच्या फिर्यादी महिलेसोबत भेटी-गाठी होत होत्या. दिनांक- 18/09/2002 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्या एक वर्षाच्या मुलासह सदर महिलेच्या घरी काही कामानिमीत्त व त्यांना भेटण्यासाठी गेली होती.

तेंव्हा त्या महिलेच्या घरी तिचा गुरु भाऊ किशोर वासुदेव भोजणे हापण तेथे होता. तेव्हा त्या दोघांनी फिर्यादी महिलेला सांगितली की तुला पहिल्या नव-याने सोडून दिलेले आहे. आम्ही दोघे मिळून तुझे दुसरे लग्न चंगल्या घरात लावून देतो असे सांगितले. पंरतु त्यासाठी आपल्याला कोल्हापूर येथे जावे लागले, असे ते दोघे म्हणाले. परंतु फिर्यादी महिलेने त्या दोघांना नकार दिला. माझ्या कडे पैसे नाहीत व मला एक लहान मुलगा आहे माझे लग्न कसे होईल ? असा प्रश्न फिर्यादी महिलेने उपस्थित केला.

तेव्हा किशोर भोजने हा म्हणाला की तुझ्या मुलाची आम्ही व्यवस्था करु. सदर महिला व किशोर भोजने यांनी फिर्यादी महिला व तिचा एक वर्षाचा मुलगा लागलीच त्याच दिवशी दुपारी 03.00 वाजेच्या सुमारास माजलगाव बसस्थानक येथे आले. पहिले पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी जाण्याचे ठरले. त्यानंतर कोल्हापुरला जायचे असे असे सांगून फिर्यादी महिला, तिचा एक वर्षाचा मुलगा, सोबत सदर महिला, किशोर भोजने हे सर्वजण बसमध्ये बसले.

त्यानंतर हे सर्वजण पंढरपूरला गेले. तेथे दर्शन घेवून पुन्हा कोल्हापुरला निघाले. तेव्हा कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर माजलगावच्या त्या महिलेने अल्य एका महिलेला फोन लावला व कोठे यायाचे असे विचारले. तेव्हा समोरच्या महिलेने बेळगावला (रा. कर्नाटक) या मी बसस्थानकला थांबते असे सांगितले होते. तेव्हा सर्व जण बसने बेळगांव येथे गेले. बेळगांव बसस्थानकात पोहोचल्यावर तेथे एक महिला भेटली. तिच्या सोबत एक दीपक नावाचा व्यक्ती होता. त्या दोघांनी मिळून यांच्यासाठी बेळगांव येथे एका लॉजवर रुम केली व त्यांनी पण एक रूम केली होती. सर्वजण तेथेच थांबले.

रात्री जेवन झाल्यानंतर माजलगावची ति महिला व किशोर भोजने, बेळगावची महिला व दीपक यांची बाजुच्या रुममध्ये काहीतरी चर्चा झाली. त्यानंतर सकाळी 06.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचा एक वर्षाचा मुलगा, माजलगावची ती महिला, किशोर भोजने, दीपक व अन्य दोन महिला असे सर्वजण बेळगांव येथून एका चारचाकी कारने हुंबळीकडे निघाले. हुबळीकडे जाताना काही अंतरावर बेळगावच्या महिलेला एक फोन आला तेव्हा गाडी एका ठिकाणी थांबविली. थोड्या वेळाने एक कार तेथे आली.

त्या कारमधून एक पुरुष व एक महिला खाली उतरले. दीपक, माजलगावची ती महिला, किशोर भोजने व बेळगावच्या महिलेमध्ये  काहीतरी चर्चा झाली. त्यांची चर्चा संपल्यानंतर ते सर्वजण फिर्यादी महिलेकडे आले व म्हणाले की तुझे लग्न करायचे आहे. तुझा मुलगा या दोघांना विक्री करू. मुलगा विक्री करण्यास फिर्यादी महिलेने नकार दिला. परंतु त्यांनी फिर्यादी महिलेचे काही एक न ऐकता एका वर्षाच्या मुलालला बळजबरीने हिसकावून दुसर्या कारने आलेल्या त्या दोघांच्या ताब्यात दिले. त्या बदल्यात त्यांच्याकडून माजलगावच्या त्या महिलेने 50 हजार रुपये नगदी घेतले व नंतर राहिलेले पैसे देवू असे सांगून तेथून ते निघून गेले.

त्यानंतर माजलगावची ती महिला फिर्यादी महिलेस म्हणाली की, आता आपण गोव्याला जावून फिरून येऊ, असे म्हणून सर्व जण गोव्याला गेले. गोव्याला फिरून परत सोलापूरला आले. दिनांक – 24/09/2023 रोजी सोलापूर येथून अंबड एसटीने बीडचे तिकीट काढून बीडला येत असताना बसमध्ये फिर्यादी महिलेजवळ एक महिला बसली होती. माजलगावची ती महिला व फिर्यादी महिला बोलत असताना या दोघींचे बोलणे त्या महिलाने ऐकले. त्यानंतर बीड येथे बसस्थानकावर बसमधून उतरल्यानंतर फिर्यादी महिलेने बसमध्ये शेजारी बसलेल्या त्या महिलेस झालेला प्रकार सांगितला व मदत मागितली.

तेव्हा ती महिला म्हणाली की, मी पोलिस आहे. घाबरु नकोस. मी पोलिसांना बोलावून घेते. तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्वजण पोलिस स्टेशनला पोहोचले व जो काही प्रकार घडला तो सांगितला.

Back to top button
error: Content is protected !!