महाराष्ट्र
Trending

कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा, शासकीय गुपिते कायद्यात बदल ! जायकवाडीच्या निर्णयाकडे छत्रपती संभाजीनगरकरांचे लक्ष !!

सातारा जिल्हा जल पर्यटनात मोठी झेप घेईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा ८० किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा जल पर्यटनात मोठी झेप घेऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जायकवाडीच्या निर्णयाकडेही छत्रपती संभाजीनगरकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निर्णयानुसार धरण क्षेत्राच्या सुरक्षितेतला प्राधान्य देत धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवले आहे. तसेच ७ किमी नंतरच्या २ किमीच्या क्षेत्राला बफर झोन म्हणून घोषित केले आहे. त्यापलिकडील जलाशयाचा विस्तीर्ण परिसर जल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा येथील शिवसागर अर्थात कोयना धरण येथील जंगले, सह्याद्री डोंगराच्या रांगा, निळेशार पाणी असे निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. या शिवसागर धरणामध्ये जल पर्यटन विकसित झाल्यास महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास पठार येथे येणारा पर्यटक शिवसागर जलाशयाकडे वळविता येईल. या माध्यमातून सातारा जिल्ह्यासाठी पर्यटकांची नवीन बाजारपेठ निर्माण होऊ शकणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार संधी निर्माण होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था विकसित होऊ शकणार आहे. या भागाचा शाश्वत आणि पर्यावरण आधारित विकासाला वेग देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!