छत्रपती संभाजीनगर
Trending

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला उच्च न्यायालयाचा दणका, बीड जिल्ह्यातील मल्हार शिक्षण संस्थेची याचिकाही फेटाळली !

'बीएड 'महाविद्यालयासंदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल

संभाजीनगर लाईव्ह, दि.२३ : पायाभूत सुविधांचा अभाव असतानाही ‘बीएड’साठी विद्यापीठास नाहरकत प्रमाणपत्र (NOC) मागणाऱ्या दोन संस्थांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ व बीड जिल्ह्यातील जयमल्हार संस्थेचा समावेश आहे.

या संदर्भात माहिती अशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बीएड, बीपीएड व विधि या शाखेतील महाविद्यालयांना चालू वर्षात ‘एनओसी’ नाकारण्यात आली. पूर्णवेळ प्राचार्य, पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या या महाविद्यालयांना चालु शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरविण्याचा मोठा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी मे महिन्यात घेतला.

या महाविद्यालयांना राज्य शासनाच्या सीईटी सेलसाठी आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र (नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) विद्यापीठाने नाकारले. त्या ठिकाणी पायाभूत सुविधा व कूशल मनुष्यबळाचा अभाव होता. तसेच पूर्णवेळ प्राचार्य व प्राध्यापकांच्या नियुक्त्याही केलेल्या नव्हत्या. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीटीई) यांच्या मानकांप्रमाणे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शिक्षक भरती करावी असे विद्यापीठ प्रशासनाने वारंवार बजावले होते.

विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ (जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय) व बीड जिल्ह्यातील सोनेगांव येथील जय मल्हार सेवाभावी शिक्षण संस्थेने (केशवराज अध्यापक महाविद्यालय) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी घेऊन न्यायमूर्ती मंगेश एस पाटील व न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रम्हे यांनी सदर याचिका फेटाळून लावली आहे.

एनसीटीईने मान्यता दिल्यानंतर विद्यापीठास ‘एनओसी’ नाकारता येत नाही अशी या संस्थांची भूमिका होती. तथापि, शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता राखण्यात विद्यापीठाने उचललेले पाऊल योग्य असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. ऍड सिद्धेश्वर ठोंबरे व ऍड संभाजी टोपे यांनी विद्यापिठाच्यावतीने बाजू मांडली. दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड नंदकुमार खंदारे यांनी काम पाहिले तर ऍड सचिन कुपटेकर व ऍड.एम डी नरवाडकर यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाच्या या निकालामुळे पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळाचा अभाव असणाऱ्या महाविद्यालयांना चांगली चपराक बसली आहे.

उच्च शिक्षण मंत्र्यांकडून दाखल

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅक संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक घेण्यात आली. या बेठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत घेतलेल्या खंबीर भूमिकेचे कौतुक त्यांनी केले. राज्यातील अन्य विद्यापीठांनी गुणवत्ता व पायाभूत सुविधाबाबत याप्रमाणेच कडक पाऊले उचलावीत, असे निर्देश या खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनीही दिले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!