छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट, पैठण तालुक्यातील नांदर गावच्या पोलिस पाटीलांची सतर्कता, पाचोड पोलिसांत धाव !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – खासदार इम्तियाज जलील यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पाचोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पवित्र रमजान सुरु असून त्या पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू नये म्हणून पैठण तालुक्यातील नांदरचे सतर्क पोलिस पाटील यांनी तातडीने पाचोड पोलिसांत धाव घेवून घडलेला प्रकार कथन केला. फेसबुकच्या एका फेक अकाऊंटवरून खा. इम्तियाज जलील यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गोपाळ दामोदरराव वैद्य (वय 52 वर्षे व्यवसाय शेती (पोलीस पाटील नांदर गाव) रा. नांदर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पाचोड पोलिस स्टेशन गाठून घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. गावांत शांतता राहावी यासाठी पोलिस पाटील गोपाळ वैद्य यांनी तातडीने याची दखल घेवून प्रकरण पोलिस दरबारी दाखल केले.

पोलिस पाटील वैद्य यांनी पोलिसांना सांगितले की, दिनांक 27/03/2023 रोजी रात्री 08.00 वाजेच्या सुमारास मौजे नांदर गावात बाजारतळात हनुमान मंदिराजवळ ते पोहोचले असता. तेथे पोलिस पाटील वैद्य यांना काही लोक घोळक्या घोळक्याने बसलेले दिसले व त्यांच्यामध्ये काही तरी चर्चा चालु होती. पोलिस पाटील वैद्य त्यांच्याकडे गेले असता सदर घोळक्यातील लोकांनी अचानक चर्चा करणे बंद केली.

त्यावेळी पोलिस पाटील वैद्य गावातील तिघांना बाजूला बोलावून विश्वासात घेवून घोळक्या घोळक्याने काय चर्चा चालु आहे, असे विचारले असता त्यावेळी त्यांनी सांगितले की, आपल्या गावातील हरीभाऊ माणिकराव फाळके (रा. नांदर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) याने त्याच्या Hari Falke या फेसबुक अकाउंटवर वेगवेगळे व्हिडीओ पोस्टे करून त्यामध्ये खासदार इम्तीयाज जलील यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर व व्हिडोओ फेसबुक खात्यावर पोस्ट केला.

सद्या पवित्र रमजान महिना चालू असल्याने त्याने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे भावना दुखावू शकतात. नांदर गावात व परिसरामध्ये जातीय तेढ निर्माण होवून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होवून भांडण होण्याची दाट शक्यताही पोलिस पाटील वैद्य यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून शांततेचे आवाहन केले आहे.

पोलिस पाटील वैद्य यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पाचोड पोलिस स्टेशनमध्ये हरीभाऊ माणिकराव फाळके (रा. नांदर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!