15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश ! जी-20 मुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ लेणीसह पर्यटन स्थळांवरील सोईसुविधा, रस्ते टकाटक होणार !!
जी-20 शिखर परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
संभाजीनगर लाईव्ह, दि.8 :- जी-20 राष्ट्रसमुहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिखर परिषदेच्या प्रतिनिधींचे 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी औरंगाबाद येथे आगमन होईल. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ लेणी आणि इतर स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनासाठी पूर्वतयारी बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, उपायुक्त जगदिश मिनियार आदी उपस्थित होते.
जी-20 परिषदेचे प्रतिनिधींचे औरंगाबाद शहरात 26 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी आगमन होणार आहे. वेरुळ तसेच महत्वाची पर्यटन स्थळे तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीची पाहणी करणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच पर्यटन स्थळांवरील सोईसुविधा, रस्ते दुरूस्ती, आरोग्य सुविधा यासह विविध सोईसुविधांचा आढावा घेतला.
जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच आलेल्या पाहुण्यांची निवास, प्रवास, आरोग्य यासह सर्व सोईसुविधा देण्याबाबत काटेकोर नियोजन करा, येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली पाहिजे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या.
जी-20 परिषदेच्या बैठक काळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत आणि त्यांच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सादरीकरण केले. मनपा आयुक्त डॉ.चौधरी यांनी औरंगाबाद महानगरात सुरू असलेल्या तयारीबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe