राजकारण
Trending

ठाण्यातील कुख्यात गुंडाला व टोळीला हल्ला करण्याची सुपारी ! संजय राऊतांचा खा. श्रीकांत शिंदेंवर सनसनाटी आरोप !!

मुंबई, दि. २१ – महाराष्ट्रातील संत्तासंघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपाने राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत असतानाच आज खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान, ठाकूर आणि शिंदे गटाने हे आरोप फेटाळून लावले असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोटे आरोप लावले जात असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहून ही तक्रार केली आहे. याच आशयाचे पत्र त्यांनी पोलिस आयुक्त यांनाही पाठवले आहे. फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात राऊत यांनी काय तक्रार केली आहे. वाचा त्यांच्याच शब्दात…

प्रिय देवेंद्रजी. २१ फेब्रुवारी २०२३

जय महाराष्ट्र!

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.

Back to top button
error: Content is protected !!