शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले ! थर्टी फस्टपर्यंत शिवसेनेच्या याचिका निकाली काढण्याचे आदेश !!
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या याचिकांवर ३१ जानेवारीपर्यंत निकाली काढण्याचे आदेश
नवी दिल्ली, दि. ३० :- महाराष्ट्रातील संत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या पक्षांतराच्या याचिकांवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकांवर ३१ जानेवारीपर्यंत निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज, ३० ऑक्टोबर रोजी दिले. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक सादर केले असता त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले.
मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठा समोर आज शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या याचिकांवर सुनावणी झाली. शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणून बुजून विलंब करत ्सल्याचा युक्तीवाद दोन्ही पक्षांच्या वतीने करण्यात आला.विधानसभेच्या अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी सुनावणीदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या याचिकाकर्त्यांनी केली.
दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला की, मागील सुनावणीदरम्यान दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांशी चर्चा केली. तुषार मेहता म्हणाले की, आता तोंडावर दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या आल्या आहेत. या सुट्ट्या लक्षात घेता, विधानसबा अध्यक्ष 31 जानेवारी 2024 पर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. त्यानुसार जानेवारीत होणाऱ्या सुनावणीची रुपरेषा व प्रगती सर्वोच्च न्यायालयाने पाहावी, अशी विनंती तुषार मेहता यांनी विधानसभा अध्यक्षांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला केली. यावर मुख्य न्यायमूर्ती (CJI) म्हणाले की विधानसभा अध्यक्षांनी 31 डिसेंबरपर्यंत कामकाज संपवावे अशी न्यायालयाची इच्छा आहे.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (शरद पवार गट) यांनी प्रलंबित पक्षांतर याचिकांवर निर्णय घेण्यासाठी दाखल केलेली याचिका देखील सोमवारी सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली होती. यावरही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी पुढील वर्षी ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर याचिकांवर सुनावणी पूर्ण करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
मागील सुनावणीदरम्यानही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय सर्व याचिकांवरील सुनावणीचे सुधारीत वेळापत्रक ३१ ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यान सादर करण्याचे आदेशित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन प्रतिस्पर्धी गटांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या पक्षांतर याचिकांवर निर्णय घेण्यासाठी वास्तववादी वेळापत्रक प्रदान करण्याची आज शेवटची संधी होती. विधानसभा अध्यक्षांनी दाखल केलेले सुधारीत वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात अमान्य करत हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाने स्वत अध्यक्षांना आता डेडलाईन दिली आहे.
मागील सुनावणीदरम्यान CJI च्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सॉलिसिटर जनरल (SG) तुषार मेहता यांचे सबमिशन स्वीकारले होते, ज्यांनी न्यायालयाला आश्वासन दिले होते की ते दसऱ्याच्या सुट्टीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांशी वैयक्तिकरित्या संवाद साधतील व सुधारीत वेळापत्रक सर्वोच्च न्यायलयात सादर करतील. त्यावेळीही आणि यावेळीही सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe