महाराष्ट्र
Trending

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी: सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा शासन निर्णय जारी ! “या” महिन्याच्या पगारासोबत मिळणार ४था हप्ता !!

वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्यांची रक्कम मिळणार

Story Highlights
  • निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्याचा शासन निर्णय जारी

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याचा शासन निर्णय आजच जारी करण्यात आला आहे.

शासन अधिसूचना वित्त विभाग, विनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३० मे, २०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक २४ जानेवारी, २०१९ आणि दिनांक १ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.

राज्यात कोविड १९ (कोरोना) या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक ०९ मे, २०२२ अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै २०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान दिनांक ०९ मे, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. तसेच या शासन निर्णयामध्ये उर्वरीत देय असलेल्या हप्त्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. या सर्व पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरीत हप्त्यांच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

असा आहे शासन निर्णय- शासनाने आता असे आदेश दिले आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२२ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्यांची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी:-

(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.

(ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

(क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

वरील (ब) आणि (क) मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत-
(i) भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

(ii) जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) दिनांक १ जून, २०२२ ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरीत हप्त्यांची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

२. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्यांच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र.१४ मधील तरतुदीनुसार दिनांक १ जुलै, २०२२ पासून व्याज अनुज्ञेय राहील.

३. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र. १४ मधील तरतूदी प्रमाणे काढता येणार नाही.

Back to top button
error: Content is protected !!