…म्हणून ४ वर्षे होऊनही केंद्रेकर संभाजीनगरमध्येच!; विभागीय आयुक्तपदी कायम असण्याचे आहे हे खास कारण!!
संभाजीनगर, दि. १२ ः शहरासाठीच्या दोन्ही महत्त्वाच्या पाणी योजनांचे नेतृत्त्व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर करत असल्याने त्यांची बदली जूनपर्यंत २०२३ पर्यंत करू नये, असे आदेशच उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. नवा अधिकारी आला तर योजनांचे काम समजून घेण्यात वेळ होईल आणि उशिर होईल, असे न्यायदेवतेला वाटते. त्यामुळेच संभाजीनगरात ४ वर्षे होऊनही विभागीय आयुक्तपदी केंद्रेकर कायम राहणार आहेत. त्यांची बदली आता आणखी सहा महिने होणे तरी अशक्य आहे.
राज्य शासनाच्या २ हजार ७१४ कोटी रुपयांच्या निधीतून शहर पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे जात आहे. ही योजना पूर्ण होण्यास आणखी अडीच वर्षे लागू शकतात. याशिवाय ७०० मिलिमीटरची जुनी जलवाहिनी बदलून १९३ कोटी रुपयांतून नवीन जलवाहिनी टाकण्याची योजना अमृत २ याेजनेत समाविष्ट झाली आहे. या दोन्ही योजनांचे काम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीत होत आहे.
ते असेपर्यंत दोन्ही कामे वेगवान पद्धतीने आणि दर्जेदार होतील, ही भावना सामान्यांची आहे. याशिवाय त्यांची बदली झाली तर पुन्हा नव्याने योजनांचे काम समजून घ्यायला नव्या अधिकाऱ्याला वेळ जाईल आणि त्याचा परिणाम योजनेवर होईल, असे खंडपीठाला वाटते. त्यामुळे त्यांना सहा महिने थांबवावे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे.
यंदा फेब्रुवारीत केंद्रेकरांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. कोरोना गेल्यानंतर त्यांची बदली होईल असे वाटत असताना पाणी योजनांनी मात्र त्यांना थांबवले आहे. जूनमध्ये त्यांच्या बदलीला ब्रेक लागला आणि आता खंडपीठाने बदली करू नये, असे आदेशच काढले. २०१८ मध्ये केंद्रेकर औरंगाबादचे विभागीय आयुक्त झाले होते. यापूर्वी त्यांनी औरंगाबादमध्ये विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त, कृषी व क्रीडा आयुक्त (पुणे) या पदांवर काम केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe