महाराष्ट्र
Trending

कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीसंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा !

कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती नाही- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ – मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता आणखी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. शासनामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून तीन हजार मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली असून ही मान्यता प्रत्यक्ष पदभरतीचा कालावधी किंवा ११ महिने यापैकी जो कमी असेल त्याच कालावधीसाठी असेल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे सांगितले. कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुंबई पोलीस आयुक्तालयाकरिता देण्यात आलेले बाह्ययंत्रणेवरील तीन हजार मनुष्यबळ हे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील असून, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील नियमित पोलीस शिपाई पदे कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर या बाह्ययंत्रणेवरील मनुष्यबळाच्या सेवा संपुष्टात येतील. या तीन हजार कर्मचाऱ्यांकडून केवळ सुरक्षा विषयक कामकाज व गार्ड विषयक कर्तव्य, स्टॅटिक ड्यूटी करुन घेण्यात येणार असून कायदे विषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नाही.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्त दलातील पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे १०,००० पदे रिक्त आहेत. दरवर्षी नियत वयोमानानुसार निवृत्त होणे, आंतर जिल्हाबदली, दरवर्षी सुमारे १५०० पोलीस निवृत्त होणे तसेच सन २०१९ ते २०२१ मध्ये पोलीस भरती झालेली नसणे, अपघात/ आजार यामुळे मृत्यू / सुमारे ५०० पोलिसांचा कोविडमुळे मृत्यू झालेला आहे. ही पदे रिक्त असण्याची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांचा विचार करून शासनाने संपूर्ण राज्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी १४,९५६ पोलीस शिपाई संवर्गातील पदे व २,१७४ पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदे तसेच एस.आर.पी.एफ (SRPF) ची पदे भरण्यास मंजुरी दिलेली असून एकूण १८,३३१ पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रमाणे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७,०७६ पोलीस शिपाई संवर्गातील पदे व पोलीस चालक संवर्गातील ९९४ पदे भरण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी नमूद ७,०७६ पदे भरल्यानंतर सुद्धा काही पदे रिक्त राहणार आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७,०७६ पोलीस शिपाई पदे नियमित भरतीद्वारे भरण्याची कार्यवाही करण्यात येत असून, भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी पोलीस शिपाई उपलब्ध होण्याकरिता आणखी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

या सर्व कारणांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाने १७ एप्रिल २०२३ रोजीच्या पत्रान्वये तीन हजार मनुष्यबळ तूर्तास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांमार्फत विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणे इ. करिता यापूर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आहे व वापरली जात असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!