छत्रपती संभाजीनगरदेश\विदेश
Trending

छत्रपती संभाजीनगरकरांना 88000 रुपये अधिक का ? हज यात्रेसाठी मुंबई हैदराबाद प्रमाणेच खर्च स्वीकारा: खा. इम्तियाज जलील

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ : हज यात्रेला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते थेट जेद्दाह विमान सेवेकरिता हज श्रध्दालुंना 88 हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत तीव्र नाराजी पसरली असून सरकार विरोधात संताप निर्माण झालेला आहे. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून मुंबई – हैदराबाद एम्बारकेशन पॉइंट प्रमाणेच छत्रपती संभाजीनगर एम्बारकेशन पॉइंटच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्याची मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि सीईओ हज कमिटी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

हज श्रध्दालुंना थेट जेद्दाहला विमान प्रवासासाठी मुंबई व हैदराबादच्या तुलनेमध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी 88 हजार रुपये व विदर्भासाठी 1 लाख रुपये जास्त मोजावे लागणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथून हज यात्रेकरिता जाणार्‍या श्रद्धांलुवर अन्याय होत आहे. तसेच श्रध्दालुंना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले आहे.

विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून मुंबई व हैदराबादला प्रवास करण्यासाठी फक्त 5 ते 6 हजार रुपयांत विमानसेवा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर, मुंबई व हैदराबाद येथील एम्बारकेशन पॉइंट वरून थेट जेद्दाहला विमान प्रवासाकरिता एकूण खर्चात 2 ते 3 हजारांची तफावत येणे अपेक्षित आहे.

मराठवाड्यातील पहिले हज हाऊस छत्रपती संभाजीनगर येथे यावर्षी सुरु होत आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळास इमिग्रेशन आणि कस्टम विभागाची अधिकृत मान्यता असल्याने मराठवाड्यासह, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र येथील श्रध्दालुंना हज उमराह करिता छत्रपती संभाजीनगर येथून जेद्दाहला जाण्यासाठी थेट विमानसेवा सुरु करण्याची दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी दिल्ली येथे झालेल्या नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी मुद्दा उपस्थिती करून तसे पत्रही दिले होते.

Back to top button
error: Content is protected !!