छत्रपती संभाजीनगर
Trending

शरणापूरच्या तलावातून मुरुमाची चोरी, अंदाजे ४०० ते ५०० ब्रास साठा खाजगी जमिनीत आढळला ! तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना जमीन मालकाचे नावही माहिती नाही ? अज्ञात माफियावर गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- शरणापूरच्या तलावातून मुरुमाची चोरी होत असल्याचे अप्पर तहसिलदारांनी आदेश दिल्यानंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी जागे झाले. मुळात त्या भागांतली महसूलच्या सर्व बेकायदेशीर कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची व त्याचा अहवाल तहसिलदारांना देण्याची जबाबदारी तलाठी व मंडळ अधिकारी यांची आहे. असे असतानाही तहसिलदारांनी मुरुम चोरी होत असल्याचे सांगून पंचनामा करण्याचे आदेश दिल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांना जाग आली. त्यानंतर महसूलचे पथक शरणापूर येथील गट क्रमांक ६० मधील तलावात पाहणी करतात. तेथे अवैध उत्खणन झाल्याचे पथकाच्या निदर्शनास येते. याशिवाय अंदाजे ४०० ते ५०० ब्रास साठा खाजगी जमीनीत होता. मात्र, ही जमीन कोणाच्या मालकीची हेही तलाठी व मंडळ अधिकारी यांना माहिती नाही ? थातूर मातूर पंचनामा व अहवाल तयार करून अज्ञात माफियावर गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार समोर आला आहे.

अभिलाशा केशव म्हस्के (मंडळ अधिकारी, ने. मंडळ कार्यालय पंढरपूर ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरचे अपर तहसिलदार यांच्या संदर्भीय पत्रान्वये फिर्याद देण्यात आली आहे. त्यात नमूद केले की, मौजे शरणापूर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गट क्रमांक 60 मधील एकूण क्षेत्रफळ 13 हेक्टर 74 आर पैकी क्षेत्रफळ 2 हेक्टर 74 आर जमीन ही लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी संपादित करण्यात आली आहे. सदर जमीनीतून अवैध गौणखनिजाची चोरी होत असल्याबाबत अप्पर तहसिलदार यांनी तोंडी सूचनेव्दारे मंडळ अधिकारी यांना कळविले की, सदर गट क्र.60 मध्ये जावून स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेशित केले होते.

त्यानुसार नायब तहसिलदार, अप्पर तहसिल कार्यालय, तलाठी सज्जा शरणापूर पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असता महसूलच्या पथकाला लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीतून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुक झाल्याचे निर्दशनास आले. सदर तलावातून मोठ्या प्रमाणात उत्खनन करून वाहतूक केल्याचे वाहनाचे चाकाचे ठसे दिसून आले. सदर गटावरिल पाझर तलावाच्या पश्चिम उत्तर बाजुस उत्खनन केलेल्या मुरुमाचा साठा केल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी अंदाजे ४०० ते ५०० ब्रास मुरुम आढळून आला.

सदर पाझर तलावाची पाहणी केली असता तलावातून मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसून आले. स्थळपाहणी वेळी उपस्थितीत असलेल्या नागरिकांना व पंचाना उतखन्नाबाबत विचारले असता त्यांनी सदर उतखन्नाबाबत काहिही माहिती नसल्याचे सांगितले. परंतु मागील 8 ते 10 दिवसांपासून तलावातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक होत असल्याचे सांगितले. गट क्र.60 मध्ये साठवणूक करून ठेवलेला साठा हा खाजगी मालकिच्या जागेत केल्याचे दिसून येते. खाजगी जागेत साठवणुक केलेला मुरुम हा मालकाच्या संमतीने केल्याची शक्यता आहे परंतु सदर ठिकाणी जागा कोणाच्या मालकिची आहे हे हद्द खुणा नसल्या कारणाने सिध्द होत नाही, हद्द खुणा आज रोजी जायमोक्यावर सांगता येत नाही.

सदरचा साठा हा महसूलच्या पथकाने जप्त केला असून त्यावर तहसिल कार्यालयामार्फत योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच पंचासमक्ष शरणापूर ते करोडी या रस्त्याला चालू असलेल्या रसत्याच्या कामाला सदर ठिकाणचा उत्खनन केलेला मुरुम वारपला असल्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर असलेल्या व्यक्तीला सदर उत्खनन कोणी केले याबाबतची विचारणा केली परंतु त्यांना माहित नसल्याने सदर उत्खनन हे अज्ञात व्यक्तीने केल्याचे दिसून येते. त्यानंतर महसूल पथकाने अप्पर तहसिलदार यांना सविस्तर अहवाल व पंचनामा सादर केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचे सांगितले. त्यानुसार अज्ञात माफियावर दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!