महाराष्ट्र
Trending

दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना-हरकत प्रमाणपत्रांबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार !

- मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. 26 : राज्यातील दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना हरकत प्रमाणपत्राबाबत जे अधिकारी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत कुठल्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येणार नाही, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना हरकत प्रमाणपत्रांबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. मंत्री देसाई म्हणाले की, आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांनी माहे जानेवारी 2019 ते मार्च, 2019 या कालावधीत ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दिव्यांगांच्या शाळांना अनुदानाच्या शिफारशींच्या प्रकरणामध्ये झालेल्या वित्तीय व प्रशासकीय अनियमिततेबाबत दिनांक 9/04/2019 व दिनांक 29/04/2019 च्या पत्रान्वये संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

या संपूर्ण प्रकरणाची एक महिन्यात नव्याने सुनावणी घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल. तसेच दिव्यांगांना शासन आपल्या दारी या योजनेंतर्गत घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र व त्याअनुषंगाने आवश्यक ते दाखले वाटप करण्यात येत असल्याची माहितीही देसाई यांनी यावेळी दिली. या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील आदींनी सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!