छत्रपती संभाजीनगर
Trending

रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई ! सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचे निर्देश !!

रस्त्यावरील अपघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

औरंगाबाद दि 13: रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन, राष्ट्रीय महामार्ग व पोलीस प्रशासनाने समन्वयातुन रस्ता सुरक्षेच्या विविध नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.

याबैठकीस जिल्हा परिषदेचे अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राधा बिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी  जनार्दन विधाते, प्रादेशिक परिवहन विजय कानेळे, अधीक्षक अभियंता विवेक बढे, मनपा उपायुक्त अर्पणा थेटे, सर्व नगरपालिकेचे मुख्यधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघात प्रवण ठिकाणाविषयीची माहिती रस्ते विकास महामंडळ त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन व पोलीस विभागाने सादर करावी. तसेच शहरांमध्ये अनेक मार्गावर वाहनांची वेग मर्यादा नियंत्रित करणारी उपाययोजना करावी. रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या असणारे रंगीत पट्टे, झेब्रा क्राँसीग, दुभाजक या विषयी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबतच्या उपाययोजनेचा अहवाल सादर करावा.

त्याचप्रमाणे वाहनांची वेग मर्यादा मोजणारी यंत्रे बसवून होणाऱ्या अपघाताला प्रतिबंध करणारी यंत्रणा कार्यान्वीत करावी. ती वेगवेगळ्या ठिकाणी बदल करुन बसविण्यात यावी, महामार्गावर रस्ता दुभाजक तोडून रस्ता ओलंडणाऱ्या नागरिकास प्रतिबंध करुन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. महानगरपालिका व शहर पोलीस यंत्रणा आणि परिवहन विभाग यांनी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भातील अहवाल सादर करण्याबाबत परिवहन विभागांना सुचित करण्यात आले. रस्ता सुरक्षा सल्लागाराची नेमणूक करून महानगरपालिका तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांमध्ये जाणिव जागृती करून अपघात नियंत्रण करण्याबाबतचे प्रयत्न सुरक्षा समितीने करावेत.

परिवहन आणि पोलीस विभाग त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी नेमणूक करावी. समितीने संबंधित विभागातील अवैध वाहतूक त्याचप्रमाणे रस्ते अपघात होणाऱ्या विविध घटनांवर प्रतिबंध आणण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी दंड भरल्याशिवाय वाहनाचे परवाने, नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी हेल्मेट वापरण्याबाबताचे आवाहन रस्ता सुरक्षा समितीच्या मार्फत करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!