पैठण
Trending

पैठण तालुक्यातील दोन तलाठ्यांसह एजंट लाच घेताना जाळ्यात ! खडी मुरमाचा हायवा चालू देण्यासाठी फोन पे द्वारे घेतली लाच !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ –खडी, मुरुमचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी ५० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी दोन तलाठ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील १० हजार रुपये फोन पे द्वारे घेतले.

ज्ञानेश्वर महालकर (वय-52 पद – तलाठी, नेमणूक- रांजणगाव खुरी, ता. पैठण), देविदास बनाईत (वय-54 पद – तलाठी, नेमणूक- मुलाणी वडगाव व लोहगाव, ता. पैठण), शिवाजी इथापे (वय 40 वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांचा खडी मुरम वाहतुकीचा व्यवसाय आहे. तलाठी ज्ञानेश्वर महालकर यांनी तक्रारदार यांचे मुरूम खडीचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी त्यांच्यासाठी व तलाठी देविदास बनाईत यांच्या साठी 40,000/- लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे फोनद्वारे तलाठी देविदास बनाईत यांना कळवले.

तलाठी ज्ञानेश्वर महालकर यांनी स्वतः साठी 30,000/- लाचेची मागणी करून फोन पे द्वारे 10,000/- स्वीकारले व शिवाजी इथापे यांनी तलाठी देविदास बनाईत यांच्या संमतीने 40,000/- तलाठी देविदास बनाईत यांच्या करीता स्वीकारले. आरोपींनी दिनांक 29/12/2022 व 30/12/2022 रोजी लाचेची मागणी केली.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिता इटूबोने, सहायक अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, सापळा पथक पो.ना. बाळासाहेब राठोड, पो. ना. विलास चव्हाण यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!