छत्रपती संभाजीनगर
Trending

शिक्षण संस्थेत क्लार्कच्या नौकरीसाठी ६ लाख रुपये घेवून फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – क्लर्क पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून शिपाई पदाची ऑर्डर देवून तसेच खात्यावर पैसे शिल्लक नसताना चेक देऊन एकूण ६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्री कालीका देवी बहउद्दीशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मौजे बाळापूर, बीड बायपास, औरंगाबाद या नावाने पैसे घेण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अनिल दादाराव उबाळे (रा. लेबर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, फौजदारी अर्ज न्यायलयात दाखल केला होता. त्यामध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी हे सन 2017 मधील फेबुरवारी महिन्यात न्यूजपेपरमध्ये श्री कालीका देवी बहउद्दीशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मौजे बाळापूर, बीड बायपास, औरंगाबाद या नावाने विविध पदासाठी नोकरी भरतीची जाहिरात वाचली होती. त्या जाहीरातीमध्ये संपर्क करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फिर्यादी यांनी कॉल केला असता त्यांनी मुलाखतीसाठी एन-2, सिडको मधील त्यांच्या ऑफीसमध्ये बोलावले होते.

त्या ठिकाणी त्यांची मुलाखत अनिल दादाराव उबाळे व एका महिलेने घेतली. मुलाखत झाल्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना सांगितले की तुम्ही क्लर्क या पदासाठी पात्र आहात आणि तुम्हाला कायमस्वरुपी नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला यासाठी 15 लाख रुपये भरावे लागतील तसेच या 15 लाखांपैकी तुम्हाला सध्या 6 लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने दि. 10/03/2017 रोजी बॅंक अकाउंटवरुन RTGS द्वारे सदर महिलेच्या नावे 5 लाख रुपये ट्रान्सफर केले. आणि अनिल दादाराव उबाळे (रा. लेबर कॉलनी हर्षनगर, औरंगाबाद) यांना १ लाख रुपये रोख रक्कम दिली.

दि. 25/05/2017 रोजी त्यांनी त्यांच्या एन-2 मध्ये असणा-या श्री कालीकादेवी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळच्या ऑफीसमध्ये जॉईनिंगसाठी बोलावले. तेथे गेल्यावर त्यांनी फिर्यादी यांना क्लार्क पदाचे नियुक्ती पत्र न देता शिपाई पदाचे नियुक्ती पत्र दिले. त्यावेळेस फिर्यादी हे त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्या कडून लिपिक पदासाठी पैसे घेतलेले आहेत आणि तुम्ही शिपाई पदाचे नियुक्ती पत्र का दिले ? त्यावर ते म्हणाले की, आपली संस्था ही 100 टक्के अनुदानीत आहे.

सध्या आम्ही तुम्हाला शिपाई पदावर नियुक्ती देत आहोत, जेव्हा तुमची शासकीय परमनन्ट ऑर्डर येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला लिपीक पदाची ऑर्डर देऊ. यावर फिर्यादी यांनी विश्वास ठेवून शिपाई पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी वर्षभर काम केले. त्यानंतर फिर्यादीला लिपीक म्हणून ऑर्डर दिली नाही. त्यामुळे फिर्यादीने पैसे परत मागितले. त्यानंतर फिर्यादीला चेक दिला मात्र तो बाऊन्स झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून अनिल दादाराव उबाळे यांच्यासह दोन महिलांवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोउपनि मस्के करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!