छत्रपती संभाजीनगर
Trending

पदव्युत्तर प्रवेशाची यादी घोषित, पहिल्या यादीत १६८७ विद्यार्थ्यांचा समावेश ! चार विद्याशाखेतील ६७ अभ्यासक्रमांना प्रवेश, विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभागातील अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम सर्व साधारण गुणवत्ता यादी शनिवारी (दि.आठ ) घोषित करण्यात आली. चार विद्याशाखानिहाय घोषित या यादीत १ हजार ६८७ जणांचा समावेश असून येत्या आठवाड्यात ’समुपदेशन फेरी’द्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत.

विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व ४५ विभाग तसेच धाराशिव उपपरिसर येथील सर्व १० विभागात ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ५ ते २६ जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण ४ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. यातील १ हजार ६८७ विद्यार्थ्यांचा पहिल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वाधिक ८३९ अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी आले आहेत तर वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी ११९ मानव्यविद्या शाखेसाठी ४३१ तर आंतरविद्या शाखेतील अभ्यासक्रमांसाठी २९८ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

विद्यापीठ मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील ६७ अभ्यासक्रमांसाठी ही नोंदणी करण्यात आली. या संदर्भात प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश समितीची बैठक शुक्रवारी होऊन प्रवेश परीक्षेचे नियोजन करण्यात आले. बैठकीस पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.आय आर मंझा, डॉ.राम चव्हाण यांच्यासह प्रवेश समितीचे २२ सदस्य उपस्थित होते. रविवारी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीतील विद्यार्थ्यांना देशां फेरीच्या माध्यमातून ११, १५ व १७ जुलै रोजी प्रवेश देण्यात येणार आहेत.

पदव्युत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. पूर्ण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १ हजार ७९४ असून याही विद्यार्थ्यांना स्पॉट अॅडमिशनच्या वेळी प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदव्युत्तर विभागातील कर्मचारी ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ’ऑनलाईन’नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना १७ ते २२ जुलै दरम्यान ’स्पॉट अ‍ॅडमिशन’ प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना रिक्त जांगावर संबधित विभागात प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेश समितीच्या सदस्यांसमवेत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी बैठक घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी विद्यार्थ्यांना झेरॉक्स , वस्तीगृह प्रवेश, कमावा व शिका योजना आदी फॉर्मसह सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. या काळात विद्यार्थ्यांनी संबंधित विभागात ’स्पॉट अ‍ॅडमिशन’ घ्यावेत, असेही पदव्युत्तर विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

पदव्यूत्तर अभ्यासक्रम :

एम.ए.- मराठी, हिंदी, ऊर्दु, पाली व बुध्दीझम, संस्कृत, स्त्री अभ्यास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, भूगोल, विदेशी भाषा, मानसशास्त्र, अर्कालॉजी, फुले-आंबेडकर विचारधारा, योगशास्त्र, संगीत, बी.पी.ए, आजीवन शिक्षण व विस्तार

एम.एस्सी – पदार्थविज्ञान, प्राणीशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, रसायनशास्त्र, जीव रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, एम.टेक रसायन अभियांत्रिकी, बी.टेक रसायन तंत्रज्ञान बी.होक/ एम.व्होक – इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, ऑटोमोबाइ्ल तंत्रज्ञान एम.बी.ए., एम.सी.ए, एम.टी.एम, मुद्रण तंत्रज्ञान, एलएलएम, एम.कॉम, एम.आय.बी, डी.बी.एम, एम.एफ, ए, एम.ए. (एम.सी.जे), एम.एड.एमपीएड, एम.लिब आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच मुख्य परिसरात सामाजिक कार्य महाविद्यालय एम.एस.डब्ल्यू अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहेत.

धाराशिव उपपरिसर – एम.एस्सी – सुक्ष्म जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणित, जल व भूमी व्यवस्थापन, एम.बी.ए, एम.ए.इंग्रजी, एम.पी.ए व एम.एड आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!