छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूजफुलंब्री
Trending

लाडकी बहीण योजना : कोणत्याही प्रकारची रक्कम, फी देण्याची गरज नाही ! गणोरी येथे नोंदणी शिबिरात जिल्हाधिकारी स्वामी यांनी साधला बहिणींशी संवाद !!

सर्व नोंदणी प्रक्रिया ही विनामूल्य, एकही बहिण लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या

छत्रपती संभाजीनगर दि.२६ – ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजना’ राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यरत आहे. पात्र महिलांनी शासकीय यंत्रणेच्या व्यक्तिंमार्फतच नोंदणी करावी. आपल्या गावातील एकही बहिण लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नोंदणीसाठी नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यात फुलंब्री तालुक्यातील गणोरी या गावात आयोजित नोंदणी शिबिरास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज भेट दिली व बहिणींशी संवाद साधला. या गावात बचत गटाच्या माध्यमातून महिलांची नोंदणी जवळपास पूर्ण होत असल्याने जिल्हाधिकारी स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.

सरपंच सरला तांदळे, तहसिलदार कृष्णा कानगुले, जिल्हा महिला विकास बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कदम, गटविकास अधिकारी श्रीमती मोरे यांच्यासह महिला बचत गटातील महिला, नोंदणीसाठी आलेल्या लाभार्थी महिलांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, या योजनेची नोंदणी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध आहे. तरीदेखील कोणतीही अडचण नोंदणी मध्ये येत असेल संबंधित नोंदणी करणाऱ्या यंत्रणेने शासनाचे तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून त्याचा उपयोग करावा. महिलांनी नोंदणीसाठी फक्त शासनाच्या यंत्रणेमार्फतच नोंदणी करावी. कुणालाही कोणत्याही प्रकारची रक्कम, फी, देण्याची गरज नाही. सर्व नोंदणी प्रक्रिया ही विनामूल्य आहे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!