राजकारण
Trending

शरद पवारांनी भाकरी फिरवली ! प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड !!

मुंबई, दि. 10:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाकरी फिरवण्याची चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज पवारांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली. अजित पवार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित ही घोषणा करण्यात आली.

खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

धमक्या देऊन कोणीही कोणाचा आवाज दाबू शकत नाही : शरद पवार

शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्याला पक्षाच्या सदस्यांनी तसेच इतर राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला होता. 5 मे रोजी पवार यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीने त्यांचा राजीनामा फेटाळला होता आणि त्यांना पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती.

दरम्यान, शरद पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पादाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन.

Back to top button
error: Content is protected !!