छत्रपती संभाजीनगर
Trending

देवळाई परिसरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालयाच्या चौकशीचे आदेश ! गैर प्रकार सुरू असल्याची तक्रार !!

देवळाईतील महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांची चौकशी, पाच सदस्यीय समिती गठीत

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ : देवळाई परिसरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालयाची शैक्षणिक विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश कुलगुरू डॉ .प्रमोद येवले यांनी केली आहेत. या संदर्भात पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी, की डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, व बी.एस्सी यासह पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २१ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेत देवळाई परिसरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालयात गैर प्रकार सुरू असल्याची तक्रार विद्यापीठाकडे दाखल झाली. त्यानंतर परीक्षेच्या कामाची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव यांच्या अध्यक्षतेखाली समिती पाठविण्यात आली.

समितीच्या अहवालानंतर कलाम महाविद्यालयाचे केंद्र रद्द करण्यात आले तसेच येथील विद्यार्थ्यांची व्यवस्था दुसरे केंद्रावर करण्यात आली. या महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा, अध्यापक, मनुष्यबळ व अन्य बाबींची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे समितीने नोंदविले. या नंतर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशाने पाच सदस्यीय चौकशी समिती शैक्षणिक विभागाकडून नेमण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाविद्यालयास सोमवारी (दि.१७) भेट देणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधीन कलम १२ (४ ) क अन्वये सदर चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, पदवी परीक्षकेत गैरप्रकार केल्या प्रकरणी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी खंबीर भूमिका घेतली आहे. गोविंदराव जीवरख पाटील महाविद्यालय (कोळवाडी) व वाल्मिकराव दळवी महाविद्यालय (शेंद्रा) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या दोन्ही महाविद्यालयांचे परीक्षा केंद्र रद्द करून प्रत्येकी दोन लाखांचा दंड सुनावण्यात आला तसेच शैक्षणिक विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे.

तर देवळाई परिसरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले तसेच शैक्षणिक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे आहे. या पुढील काळातही परीक्षेच्या कामात दिरगांई, गैरप्रकार करणा-या महाविद्यालयांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश परीक्षा विभागात कुलगुरु यांनी दिले आहे.

Back to top button
error: Content is protected !!