महाराष्ट्र
Trending

प्रा.डॉ. ललित अधाने यांच्या ‘माही गोधडी छप्पन भोकी’ काव्यसंग्रहाचे किशोर कदम यांच्या हस्ते प्रकाशन !

संभाजीनगर लाईव्ह, दि.१७ – मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार प्रा.डॉ. ललित अधाने यांच्या  “माही गोधडी छप्पन भोकी” या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ प्रसिद्ध कवी, गीतकार व सिने अभिनेते किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी.विठ्ठल व डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी दिली.

डॉ.ललित अधाने हे १९९० नंतरच्या पिढीतील एक महत्त्वाचे कवी असून मराठवाड्यातील साहित्य चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान व उन्मानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले. त्यांचा यापूर्वी “कुणबी बाप” हा काव्यसंग्रह प्रचंड गाजला. विविध विद्यापीठांमध्ये त्यांच्या कवितेचा अभ्यासक्रमातही समावेश झालेला आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहास कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार यासारखे नामांकित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच त्यांचा ‘नाट्यानुबंध’ हा समीक्षा ग्रंथ प्रकाशित असून त्यांनी ‘वाडमयीन प्रवृत्ती तत्त्वशोध’ या ग्रंथाचेही संपादन केले.

सदरील प्रकाशन समारंभ निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात रविवार, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:४५ वाजता आयोजित केलेला असून या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थान मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील भूषवणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, अक्षरवाङमय प्रकाशनचे बाळासाहेब घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती  लाभणार आहे.तर साक्षेपी समीक्षक व कवितारती या नियतकालिकाचे संपादक  डॉ. आशुतोष पाटील , मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक डॉ. कैलास अंभुरे हे ‘ माही गोधडी छप्पन भोकी ‘या काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहेत.

 या प्रकाशन सोहळ्यास साहित्य रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे,मराठवाडा साहित्य परिषद शाखा- खुलताबाद. प्रगतीशिल लेखक संघ, तिफण वाचक चळवळ , कन्नड. उन्मनी प्रतिष्ठान, विश्व मराठी अध्यापक परिषद,अ.भा. बहुजन साहित्य परिषद, शताब्दी काव्य मंडळ, समस्त गावकरी मंडळ संगमेश्वर विरमगाव आणि कवितेवर नितांत श्रद्धा असलेला साहित्यस्नेही गोतावळा यांनी केले आहे .

Back to top button
error: Content is protected !!