छत्रपती संभाजीनगरसोयगाव
Trending

सोयगाव: धारदार कुकरी फिरवून चाळीसगावच्या युवकाची दहशत, लोक सैरावैरा पळू लागले ! बनोटीत आलेल्या पत्नी व तिच्या नातेवाईकाचा खून करण्याचा डाव पोलिसांनी उधळला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – सोयगाव तालुक्यातील बनोटीत रात्रीच्या सुमारास धारदार हत्यार कुकरी (चॉपर) घेऊन फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण करणार्या युवकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. धारदार हत्यार पाहून लोक सैरावैरा पळत असल्याची माहिती पोलिांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोठ्या शिताफिने त्याला धारदार हत्यार कुकरीसह पकडले. सदर युवक चाळीसगाव तालुक्यातील असून त्याच्यात आणि पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी बनोटीत आली असून पत्नीचा आणि तिच्या नातेवाईकाचा खून करण्यासाठी येथे आलो असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विजय यूवराज मोरे (वय 31 वर्षे रा. पातोंडा ता. चाळिसगाव जि.जळगाव) या युवकाच्या ताब्यातून कुकरी पोलिसांनी जप्त केली आहे. पोह राजू निवृत्ती बर्डे (नेमणुक पोलीस ठाणे सोयगाव अंतर्गत बनोटी पोलिस चौकी जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 25/09/2023 रोजी 22.30 वाजता पोह राजू बर्डे व सोबत पोउपनि शेख, पोअं तळेगावे श्री गणपती निमीत्ताने बनोटी गावात खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत होतो.

23.15 वाजेच्या सुमारास बनोटी कमान जवळ रोडने पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून गोपनिय माहीती माहीती मिळाली की एक जण बनोटी गावात कृष्णा ऑटो गॅरेजचे बाजुला रोडवर हातात धारदार हत्यार कूकरी (चॉपर) घेऊन फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी तातडीने छापा टाकण्याची तयारी केली. पोलिस कृष्णा ऑटो गॅरेज जवळ पोहोचले असता बरेच लोक सैरावैरा पळताना दिसून आले.

पोलिसांनी झाडा मागे थांबून पाहिले असता एक जण त्याच्या हातातील हत्यार हात उंचावून हवेत फिरवतांना दिसून आला. पोह राजू बर्डे, पो अं तळेगावे यांनी पाठीमागून जावून त्याचे हात पकडून उजव्या हातातील हत्यार व डावे हातातील लाकडी म्यान (कव्हर) काढून घेतले. सदर युवक हा रागाने पोलिसांशी झटापट करू लागला. त्यावेळी त्यास बळाचा वापर करून ताब्यात घेवून शांत केले. विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विजय यूवराज मोरे (वय 31 वर्षे रा. पातोंडा ता. चाळिसगाव जि.जळगाव) असे सांगितले.

त्यावेळी त्यास असे धारदार शस्त्र हवेत फिरवून दहशत पसरविण्याची कारण विचारले असता त्याने सांगितले की, पत्नी व आमचेमध्ये वाद झाल्याने ती बनोटी येथे नातेवाईकांकडे आली आहे अशी माहीती मिळाल्याने मी तिचा व तिच्या नातेवाईकांचा खून करण्यासाठी आलो आहे असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याजवळील धारदार हत्यार कूकरी (चॉपर) जप्त केले आहे.

याप्रकरणी पोह राजू निवृत्ती बर्डे (नेमणुक पोलीस ठाणे सोयगाव अंतर्गत बनोटी पोलिस चौकी जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये विजय यूवराज मोरे (वय 31 वर्षे रा. पातोंडा ता. चाळिसगाव जि.जळगाव) या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!