महाराष्ट्रराजकारण
Trending

बीड जिल्ह्यात 6 पैकी 5 बाजार समित्यांवर महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ! परळी-अंबाजोगाईत धनंजय मुंडेंचा विरोधकांना धक्का !!

बीड जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडेंचा बोलबाला

Story Highlights
  • गेवराईत अमरसिंह पंडितांनी चारली विरोधकांना धूळ
  • बीड मध्ये संदीप क्षीरसागरांनी काकांची 35 वर्षांपासूनची सत्ता उलटवली!
  • वडवणीत प्रकाश दादांनी विरोधकांना शून्यावर केले बाद!
  • आष्टी मध्ये बिनविरोधचा तह तर भाजपला केवळ केजमध्ये समाधान
  • बीड जिल्हा राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे आजच्या निकालातून सिद्ध - धनंजय मुंडे

बीड, दि. २९- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सबंध बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालातून सिद्ध केले आहे.

परळी मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असलेल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या 18 पैकी 15 जागा निवडणूक आल्या आहेत. तर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अद्याप मतमोजणी सुरू असून, 18 पैकी 11 जागा धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या आहेत, तर उर्वरित सातही जागी धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत.

गेवराई मध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने 18 पैकी सर्व 18 जागा जिंकून काही जागी विरोधकांचे अक्षरश: डिपॉझिट जप्त केले आहे. वडवणी बाजार समितीच्या निवडणुकीत आ. प्रकाश दादा सोळंके व माजी आ. केशवराव आंधळे यांच्या एकत्रित लढ्यात भाजपने शरणागती पत्करली असुन इथेही राष्ट्रवादी व महाविकास आघाडी मिळून 18 पैकी 18 जागा विजयी झाल्या आहेत.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या आहेत, या विजयाने जयदत्त क्षीरसागर यांची 35 वर्षांपासूनची सत्ता पालटली असून, महाविकास आघाडीच्या सर्वांनीच जल्लोष केला आहे.

आष्टी बाजार समिती निवडणुकीत झालेल्या तहामुळे ही निवडणूक याआधीच बिनविरोध झालेली असून, इथे सुरेश धस गटाचे 11, राष्ट्रवादीचे 3, भीमराव धोंडे गटाचे 3 तर शिंदे सेनेचा 1 उमेदवार विजयी ठरले होते. केज बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र भाजपला 14 जागा मिळाल्या असून, जिल्ह्यातील केवळ एका विजयावर समाधान मानावे लागले आहे.

एकूणच या निवडणुकीतील विजयाचा ‘स्ट्राईक रेट’ व निवडणूक झालेला 6 पैकी 5 हा निकाल धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब करणारा ठरला आहे.

बीड जिल्हा राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला – धनंजय मुंडे

या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे आजच्या या निकालातून सिद्ध झाले असल्याचे म्हटले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत जरी ठराविक लोकांना मतदानाचा अधिकार असला तरी तरी ते लोक ग्रामपंचायत, सोसायटी, व्यापारी, हमाल-मापाडी अशा विविध समूहाचे नेतृत्व करत असतात. त्यांचे मत हे त्यांच्या समूहाचे मत मानले जाते. त्यामुळे हा निकाल सर्वांच्याच डोक्यात प्रकाश पाडणारा असून, महाविकास आघाडी साठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे सिद्ध करणारा आहे. या निवडणुकीत निवडून आलेले सर्व उमेदवार, त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे अभिनंदन तसेच सर्व मतदारांचे जाहीर आभार मानतो, असेही धनंजय मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!